आपल्याबद्दल

बर्वे ( बरवे ) कुल स्नेह संवर्धक मंडळ – बर्वे कुटुंबाची ही संस्था सोसायटी अॅक्टखाली आणि चॅरिटी कमिशनरकडे रजिस्टर झाली आहे.
सोसायटी अॅक्ट रजि. ७५९ दि. १८.०१. २००१
पब्लिक ट्रस्ट अॅक्ट रजि. नं. एफ् – ९८३४ दि. ३१-१०-२००१ PAN No. AAATB 6706A
द्वारा – श्री नंदकुमार रा. बर्वे , ९ पुष्कराज सोसा., लोहार आळी , ठाणे-४००६०१ फोन २५३६९०४१

एखादी संस्था भरभराटीस येते, प्रगतीपथावर असते कार्य करीत राहते, परंतु त्या कार्याचा प्रारंभ कसा झाला, कुठे झाला, संस्था स्थापन करावी असा विचार कुणाच्या मनात कसा आला यासंबंधी माहिती उपलब्ध नसते, मात्र अशी माहिती मिळणे उद्बोधक ठरते असा अनुभव आहे.

या संस्थेच्या स्थापनेशी श्री.भा.ल.तथा मधुकाका बरवे यांचा निकटचा संबंध होता. मधुकाकांचे त्यावेळी वास्तव्य चिपळूण येथे होते. सन १९७४ च्या फेब्रुवारी महिन्यात एके दिवशी श्री.नाना बरवे, श्री.यशवंत बरवे व मधुकाका यांच्या गप्पांच्या ओघात असा एक विषय निघाला की आपण श्री. कोळेश्वर दर्शनाकरिता येथील ७/८ बरवे मंडळींची एक सहल काढावी ! हा विचार विस्तारित होऊ लागला की हा कार्यक्रम सहलीपुरताच आणि नातेवाईक आणि थोड्या मित्रमंडळीपुरताच का मर्यादित ठेवायचा? आणि असे एकत्रित येणे दरवर्षी होईल असे काही ठरविता येईल का? बरवे कुळातील सर्वच कुटुंबांना एकत्रित करता येऊ शकेल का? असा विचार करता करता एक गोष्ट लक्षात आली की हे घडविण्याकरिता एक स्थायी स्वरुपाची व्यवस्था उभी करणे आवश्यक आहे. म्हणजेच एक विहित संस्थाच निर्माण होणे आवश्यक आहे. त्यायोगे बरवे कुल घटकांकरिता हितकारक अश्या आणखीही काही गोष्टी साधता येऊ शकतील!

मधुकाकांच्या घरी झालेल्या बैठकीत हा सर्व विचार मांडला, थोडी चर्चा झाली,विचार विनिमय झाला आणि सर्वांनी हा विचार उत्साहपूर्वक मान्य केला. आपण बरवे बंधू भगिनी करिता एक संमेलन आयोजित करू या विचारला एक चालना मिळाली.

पुढे मुंबईत व पुण्यात बैठकी झाल्या. ह्या बैठकीत हा विषय मांडल्यावर सर्वांनी या कल्पनेचे स्वागत केले आणि संमेलनाला चांगल्या संख्येने सहभागी होण्याचे आश्वासन दिले. प्रथम संमेलन दि. ११,१२,१३ मे १९७४ या दिवशी आयोजित केले गेले. या संमेलनात खालील गोष्टींचा विचार व्हावा असे सर्वांना वाटले.
१)संस्थेची घटना २) बरवे कुल वृतांत ३) राखीव निधी.
नंतर या संमेलनात बरवे कुल स्नेह्संवर्धक मंडळाची विधिवत स्थापना होईपर्यंत एक अस्थायी समिती निवडण्यात आली आणि या मंडळाच्या प्रत्यक्ष कार्याचा शुभारंभ झाला.

१९७५ या वर्षीही परत कोळथरे येथे १० ते १२ मे रोजी स्नेहसंम्मेलन व वार्षिक सर्व साधारण सभा संपन्न झाली. ह्या संमेलनात संस्थेची नियमावली बर्वे मंडळी समोर मांडण्यात आली. सर्व बाजूचा विचार करून त्यावर कलमवार चर्चा होऊन संस्थेची नियमावली या सभेत मंजूर करण्यात आली.

१९७६ साली मुंबई शाखेची स्थापना झाली. ह्यावेळी कुलवृत्तांताचे काम पण जोमाने चालू होतेच. बर्व्यांनी बर्व्यांसाठी लिहिलेला समस्त बर्वे कुलाचा पहिला कुलवृत्तांत १९७७ साली प्रकाशित झाला. पुढे ह्या कुलवृत्तांताचा दुसरा खंड १९८३ साली प्रकाशित झाला.

१९७८ साली केंद्रीय कार्यालय पुणे येथून मुंबई येथे आणण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष कै. द. सी. बर्वे ह्यांनी मंडळाचे कार्य व्यावसायिक पद्धतीने चालण्यासाठी अनेक गोष्टी केल्या. ह्याच दरम्यान त्यांनी विद्यार्थी सहायता निधी स्थापन केला. अनेक बर्वे मंडळीना संस्थेचे सभासद करणे, स्नेह संमेलन, विद्यार्थी सहायता, वधू वर सूचक मंडळ ही कार्य चालूच राहिली .

१९८९ ते १९९५ दरम्यान काही कारणास्तव मंडळाचे कामकाज थंड पडले.

१९९५ मध्ये श्री.नंद्कुमार बर्वे ह्यांच्या अध्यक्षते खाली नव्या कार्यकारिणीने अथक परिश्रम करून बर्वे मंडळाला नव संजीवनी दिली. त्रैमासिक कुलवार्ता , वाढदिवसांची अभिनंदन पत्रे , शाखाविस्तार , वैयक्तिक भेटी , गृहलक्ष्मी पुरस्कार , अन्नपूर्णा पुरस्कार , आदर्श कार्यकर्ता /कार्यकर्ती पुरस्कार ,उद्दयोजक बर्वे , कुलवृत्तांताचे प्रकाशन व सर्व बर्वे मंडळींची अभेद्य साखळी निर्माण करण्यासाठी निरनिराळ्या ठिकाणी घेण्यात येणारी वार्षिक संमेलने, बर्वे उद्योजक सूची असे अनेक उपक्रम ह्या नवीन कार्यकारिणीने राबविले.

गेल्या काही वर्षात अनेक उद्योजक व विद्यार्थ्यांना आर्थिक सहायता देण्यात आली. विशेष उल्लेख करावासा वाटतो कि मदत मिळालेल्या बर्वे कुटुंबीयांनी कर्जाची परतफेड करण्यास सुरुवात केली. ह्यामुळे मंडळाला कार्य अधिक जोमाने करण्यास हुरूप येत आहे.

आपल्या मंडळाचे अध्यक्ष श्री. म. शं. बर्वे यांच्यासह १८ सदस्य केंद्रीय कार्यकारिणीमध्ये आहेत. यात सर्व शाखांचे प्रतिनिधी सदस्य आहेत. हे सदस्य दर तीन महिन्यांनी बैठकीसाठी वेगवेगळ्या शाखांच्या ठिकाणी भेटत असतात. त्या बैठकीत बर्वे मंडळींच्या हिताचे विविध कार्यक्रम, त्यासाठी नियोजन केले जाते. अधिकाधिक बर्वे मंडळीना त्यांच्या शिक्षण आणि व्यवसायात मदत होईल यासाठी विचार केला जातो.

बदलत्या काळाप्रमाणे आपणामध्येही बदल करणे हे क्रमप्राप्तच आहे. आताचे दिवस हे माहिती तंत्रन्यानाचे असून आपणही एका क्लिक वर उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यासाठी आमच्या तरुण तंत्रज्ञानि बरीच मेहनत करून आपली सर्व माहिती एकाच क्लिकवर देणारी वेबसाईट तयार केली असून २०-२१ सप्टेंबर २०१४ च्या पुणे येथील संमेलनात ती बर्वे कुटुंबियांना अर्पण करण्यात आली आहे.