कुलस्वामिनी जोगेश्वरी ( योगेश्वरी )
श्री कुलस्वामी कोळेश्वरश्री कुलस्वामी कोळेश्वर
बर्वे यांचा कुलस्वामी श्री कोळेश्वर हा आहे. श्री कोळेश्वरांचे मंदिर रत्नागिरी जिल्ह्यात कोळथरे येथे आहे. कोळथरे येथेच बर्वे यांची वस्ती होती. काही बर्वे मंडळीनी देशकालपरत्वे इतरत्र स्थलांतर केले व त्या त्या ठिकाणची कुलदैवते आपली मानली तथापी श्री कोळेश्वर हा फार वर्षांपासून बर्वे मंडळींचा कुलस्वामी आहे.
श्री कोळेश्वरांचे स्वयंभु स्थान दाभोळ बंदरापासून अदमासे ४ मैलावर कोळथरे ह्या गावी आहे. स्वयंभु लिंगातून सतत २४ तास झिरपत असते त्याला गंगा तिर्थ ही म्हणतात. श्री कोळेश्वराच्या पिंडीतून झिरपलेली ही गंगा कोणत्याही ऋतुत आपणास तीर्थ म्हणून घेता येते. २४ तासात ह्या पिंडीतून सुमारे २ ते ३ लिटर तीर्थ बाहेर पडते. कोळेश्वर हे दैवत त्रिगुणात्मक ब्रह्मा, विष्णु महेशात्मक आहे. हे केवळ शिव दैवत नाही. श्री कोळेश्वऱापुढे नंदी नाहीं. श्री कोळेश्वरांचे देवालय रा. लाटे ह्यांनी बांधले. देवालय सुमारे ६० फुट लांब व २५ फुट रुंद आहे. त्याचे एकंदर ३ विभाग आहेत. पहिला सभा मंडप असून तो २२ फुट लांब व २५ फुट रुंद आहे. त्या पुढील भाग २३ फुट लांब व २२ फुट रुंद आहे. ह्या विभागात अनुष्ठानासाठी वैदिक ब्राह्मण बसतात. ह्या भागावर वर्तुळाकृति घुमट आहे. त्यानंतर तिसरा भाग म्हणजे गाभारा होय. या वरही वर्तुळाकृति घुमट आहे. गाभारा १५ फुट लांब व २० फुट रुंद आहे. देवालयाची भिंत जांभ्या दगडाची असुन ती साडे पाच फुट रुंद आहे. गर्भागार घुमटा सह विभाग, पंच नंदीकर जोशी यांनी बांधला. नंतर काही दिवसांनी क्रमांक २चा भाग घुमटा सह श्री लाटे यांनी बांधला व सभा मंडप विभाग कै. बाबासाहेब आघारकर यांनी लोकांकडून मदत मिळवून शके १७८० ते १८०० या काळात बांधला.
श्री कोळेश्वर देवाचा उत्सव दर वर्षी कार्तिक शुद्ध दशमी पासून ७ दिवस म्हणजे कार्तिक वद्य प्रतिपदे पर्यंत मोठ्या थाटात साजरा होतो.
कोळेश्वर देवस्थान पुजारी : श्री. शरदचंद्र कृष्णाजी सोमण
दूरध्वनी क्रमांक :- ०२३५८ – २८५ २३९
कोळथरे भक्तनिवास : श्री. नंदू दातार ;
दूरध्वनी क्रमांक :- ०२३५८ – २८५३०४
कुलस्वामिनी जोगेश्वरी ( योगेश्वरी )
बर्वे घराण्याची कुलस्वामिनी श्री जोगेश्वरी आहे. जोगेश्वरीचे मंदिर मराठवाड्यात जोगाईचे आंबे या गावी आहे. या गावाला आता लोक आंबे जोगाई म्हणतात. बीड पासून आंबे जोगाई जवळ आहे. श्री जोगेश्वरी देवीचे मंदिर आंबे जोगाई शहराच्या मधोमध वाहणाऱ्या जयंती नदीच्या पश्चिम तीरावर फार प्राचिन काळा पासून अस्तित्वात आहे. श्री जोगेश्वरी मंदिराची रचना हेमांड पंथी आहे. मंदिराचे प्रवेशद्वार तीन फूट उंचीचे अहे. या मंदिराचे दगडी खांबावर शिल्प कोरलेली आहेत. गाभारा खडकांत कोरलेला आहे. सभा मंडप ९० x ४५ फूट दगडातच कोरलेला आहे. इ. स. १२४७ सालचा, सिंधवा राजाच्या वेळेचा एक शिलालेख तेथे आहे. प्राचीन काली मंदिर तीन शिखरांचे होते. नंतर त्याचा जिर्णोद्धआर झाला. महाद्वारासमोर एक कुंड असून त्याला सर्वतीर्थ म्हणतात.
गाभाऱ्या मध्ये देवीची मूर्ति तांदळा स्वरुपाची आहे. हा तांदळा चार फूट चबुतऱ्यावर असून ती साधारणतः ओंकार स्वरूपाचा दिसतो. तो सुमारे तीन फूट उंच व दोन फूट रुंद आहे. देवीचा कमरेपासून वरील भागच फक्त दृग्गोचर आहे. या तांदळयाला तोंड, नाक, डोळे आदि अवयव आहेत. सांप्रत यावर उपनेत्र बसविले आहेत. मस्तकावर अंगचा मुकुट कोरलेला आहे. भाल प्रदेशी पिंपळ पाणं शोभत आहे.
देवीचा उत्सव अश्विन महिन्यात नवरात्रात होतो. त्याच प्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात शुद्ध सप्तमी नऊ दिवस होतो. मार्गशीर्ष पौर्णिमा हा देवीचा अवतार दिवस आहे.
श्री जोगेश्वरी संबंधी एक लोक कथा प्रचलित आहे त अशी – श्री भगवान परशुरामाने समुद्र हटवून कोकण निर्माण केल्यावर शेती करण्यासाठी त्यांना माणसांची आवश्यकता भासली. ते फिरत फिरत आंबे जोगाईस आले व तेथील चौदा गोत्रांची साठ कुटुंबे घेऊन गेले. ही कुटुंबे पुढे कोंकणातच स्थायिक झाली. आंबे जोगाईस असताना या कुटुंबांची कुलदेवता जोगेश्वरी होती ती पुढे कायम राहिली.
राहण्याची सोय: योगेश्वरी यात्री निवास
अंबाजोगाई
दूरध्वनी क्रमांक : ०२४४६ – २४४ ५५९


