कार्य

आप्तेष्टांची ओळख, बर्वे मंडळीत स्नेहसंवर्धन करणे अशा प्राथमिक उद्देशाने बर्वे मंडळाची स्थापना झाली. बर्वे मंडळ स्थापन झाल्या पासूनच विविध कार्यक्रम हाती घेतले जेणेकरून बर्वे मंडळीत घरोबा वाढला. अनेक बर्वे मंडळी पण ह्या कार्यात मदत करण्यास पुढे आली.

१. बर्वे कुलवृत्तांत : १९७७ आणि २००७ मध्ये बर्वे (बरवे ) आडनांव असणाऱ्या चित्पावन मंडळींचा कुलवृत्तांत प्रकाशित करण्यात आला.

१९७७ च्या कुलवृत्तांताचे संपादक श्री श्रीकृष्ण गोविंद बर्वे हे होते. पुण्याच्या वेद विद्या प्रकाशनाच्या सौ शैलजा गणेश बर्वे या मुद्रक होत्या. सुमारे पांचशे पृष्ठसंख्येच्या या प्रकाशनाची किंमत अवघी दहा रुपये होती.

२००७ ला प्रकाशित झालेला सध्याचा सातशे पृष्ठांचा कुलवृत्तांत आणि त्याबरोबर विस्तृत तक्ते आणि संदर्भसूची अतिशय माहितीपूर्ण आहेत. श्री दिनकरराव बर्वे यांनी अखंड परिश्रम घेत हा संपन्न केला हेही आपण पाहिले आहेच .

२. वाढदिवस अभिष्टचिंतन : सुरुवातीला केंद्रीय कार्यकारिणी मंडळातील सदस्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा पत्र देण्यास सुरुवात केली. पुढे हेच कार्य विविध शाखांनी आपल्या हाती घेऊन अधिक बर्वे मंडळींपर्यंत ह्या शुभेच्छा पोहोचवल्या. जेथे शाखा नाही त्या गावातील बर्वे मंडळीना वाढदिवस शुभचिंतन पत्र पाठवण्याचे काम श्री. नंदकुमार बर्वे स्वतः करतात.

3. वार्षिक स्नेह संम्मेलन : दर वर्षी प्रत्येक शाखा आळी पाळीने वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडत असते. देश विदेशातील सर्व बर्वे मंडळी ह्या निमित्ताने एकत्र येतात. ओळख, अनौपचारिक गप्पा टप्पा, मनोरंजनात्मक कार्यक्रम ह्यासोबत वार्षिक सर्व साधारण सभा, युवा संमेलन आणि यंदा पासून उद्योजाग संमेलन पण आयोजित करण्यात येते. बर्व्यांचा कुलाचार म्हणून कुलस्वामीचे लघुरुद्र पण आयोजित करण्यात येते. संमेलनाचे दिवस म्हणजे जणू काही घरातील मोठा उत्सवच असतो.

4. सांस्कृतिक कार्यक्रम : सगळ्याच बर्वे मंडळींना दर वर्षी वार्षिक सभा व संमेलनाला उपस्थित राहता नाही. म्हणून प्रत्येक शाखा वर्षभरात चैत्र गौर, कोजागिरी, मकर संक्रांत असे कार्यक्रम आयोजित करतात. यावेळी बर्वे मंडळीना एकमेकांशी नव्या ओळखी होऊन अनौपचारिक चर्चा करण्याची संधी मिळते. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी केंद्रीय कार्यालयातर्फे प्रोत्साहन म्हणून प्रत्येक शाखेला वार्षिक अनुदान दिले जाते.

५. ज्येष्ठांचा सत्कार : वार्षिक स्नेहसंमेलनात त्यावर्षी वयाची ७५ वर्षे पूर्ण झालेल्या बर्वे व्यक्तींचा सन्मान केला जात असे. यावर्षीपासून हा सन्मान स्थानिक शाखेच्या कार्यक्रमात करण्याचे सर्वानुमते ठरले आहे.

६. विद्यार्थ्यांचा गुण गौरव: वार्षिक स्नेहसंमेलनात त्यावर्षी दहावी-बारावी व अन्य अभ्यासक्रमात नैपुण्य मिळविणाऱ्या बर्वे विद्यार्थी- विद्यार्थिनीचा सन्मान केला जात असे. यावर्षीपासून हाही सन्मान स्थानिक शाखेच्या कार्यक्रमात करण्याचे सर्वानुमते ठरले आहे.

७. अन्नपूर्णा पुरस्कार : बर्वे घराण्यातील मुली सून म्हणून बाहेर जातात. सासरी जाऊन आपल्या कला गुणांनी स्वतःचे एक विशेष स्थान मिळवतात. अशा माहेर वाशिणींचे कौतुक करण्यासाठी केंद्रीय कार्यालय तर्फे त्यांचा अन्नपूर्णा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येतो.

८. गृहलक्ष्मी पुरस्कार : बर्वे घराण्यात सून म्हणून आलेल्या महिला बर्वे घराण्याच्या उत्कर्षासाठी कष्ट घेत असतात. ह्या सोबत विविध क्षेत्रात आपले एक वेगळे अस्तित्व निर्माण करतात. अशा महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी दर वर्षी त्यांना केंद्रीय कार्यालया तर्फे गृहलक्ष्मी पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो.

९. आदर्श कार्यकर्ता / कार्यकर्ती पुरस्कार : अनेक वर्षे कुठल्याही फळाची अपेक्षा न करता आपले कार्यकर्ते / कार्यकर्त्या बर्वे कुटुंबाला एकत्र आणण्याचे अमुल्य काम करत अस्तत. अशा कार्यकर्त्यांचा सन्मान आदर्श कार्यकर्ता / कार्यकर्ती पुरस्काराने केला जातो. मंडळा तर्फे कार्यकर्त्यांचा गौरव करण्याचा हा एक छोटा प्रयत्न होय.

विविध पुरस्कारांच्या नावाची निवड केंद्रीय कार्यकारिणीतर्फे केली जाते.

१०. गुणवंत विध्यार्थ्यांना अर्थसहाय्य: गुणवंत विद्यार्थ्याना मंडळातर्फे पुढील शिक्षणाकरिता आर्थिक सहाय्य दिले जाते. शिक्षण पूर्ण होताच विद्यार्थी ते परत करतात. त्यामुळे पुढील विद्यार्थ्यांना मदत करता येते. शैक्षणिक निधीला सहाय्य करून आपण याला हातभार लावू शकता.

११. बर्वे उद्योजकांना अर्थसहाय्य: उद्योजकांना व्यवसाय सुरु करायला किंवा विस्तारासाठी मंडळ मदत करते. या उद्योजक निधीला सहाय्य करून आपण याला हातभार लावू शकता. व्यवसायानिमित्त नव्याने संपर्कात आलेल्या बर्वे उद्योजकांना या उपक्रमाची माहिती देऊया.

१२. आपातकालीन निधी व अर्थसहाय्य: मंडळा तर्फे एका छोट्या आकस्मिक आपत्ती निधीची व्यवस्था केली जात आहे. ह्या निधीतून नैसर्गिक आपत्तीग्रस्त बर्वे मंडळीना मदत करण्यात येते.